श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 220
☆ तन काटेरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
तन काटेरी आत गोडवा
जीवन अपुले असेच घडवा
☆
नको दुरावा नकोच भांडण
नकोच प्रेमाचे या शोषण
तीळगुळासम हृदये जुळवा
तन काटेरी आत गोडवा
☆
हलवा करतो अमृत सिंचन
मुखात असुद्या असेच वर्तन
क्रोध अंतरी किल्मिष दडवा
तन काटेरी आत गोडवा
☆
रंग बिरंगी पंतग आपण
आकाशाचे करुया मापन
अभेद उंची अशी वाढवा
तन काटेरी आत गोडवा
☆
दोर तुटला तरीही झुलतो
वाऱ्यासोबत मस्ती करतो
बालचमुंनी झेलुन घ्यावा
तन काटेरी आत गोडवा
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈