सौ.वनिता संभाजी जांगळे
कवितेचा उत्सव
☆ एक घरटे… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆
☆
धुक्यातून उधळत येती
रंग सोनेरी पिवळे
पानाआडून जागती
फांदीवरी एक घरटे
*
हळूच उघडत जाती
चिमुकले लुकलुक डोळे
इवल्याशा चोचित येती
मधूर किलबिल गाणे
*
सुर धरून गाऊ लागती
छेडीत सुरांचे तराणे
हळूच डोकावत येती
रवीकराची नाजूक किरणे
*
घरट्याच्या दाराशी होती
पंखांचे हळूच फडफडणे
दूर पक्षिणी उडून जाती
चोचित आणण्या दाणे
*
किलबिल गुंजू लागती
इवल्याशा जीवाचे रडणे
बळ अजून पंखात नसती
नसे ते आईमागुन धावणे
☆
© सौ.वनिता संभाजी जांगळे
जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली
संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈