☆ कवितेचा उत्सव ☆ शब्दांची गुंफण ☆ सौ. मनीषा रायजादे-पाटील ☆
शब्दांची गुंफण मी
काळजातून करते
भाव सारे मनातले
शब्दांसोबत मांडते
शब्द वारा वाहताना
जीवन कळी उमलते
नक्षत्रांचा साज ऋतू
गंध शब्दांसवे उधळते
दुःखाला सारून दूर
शब्द अमृतधार बरसते
प्रेमाचा तेवता दीप
हृदय कुपीत लावते
जीवनाच्या वाटेवर
शब्दांसोबत चालते
शब्दांच्याच कुशीत
वात्सल्य ओंथबते
नाद तरंगे विश्वब्रह्म
शब्दांतुन झंकारते
हृदयाच्या मृदुंगावर
शब्द अभंग आळवते
© सौ. मनीषा रायजादे-पाटील
सांगली
9503334279
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈