? कवितेचा उत्सव ?

☆ गौरव मराठीचा… ☆ डॉ. मधुवंती कुलकर्णी ☆

महाराष्ट्राच्या मातीमधुनी जन्मते मराठी

मातपित्याच्या लाघवामधे पाझरे मराठी

*

पसायदानी दीपामध्ये तेवते मराठी

तुकयाच्याही गाथेमध्ये गातसे मराठी

*

म्हाइंभटांचे लीळाचरित्र पेरते मराठी

चक्रधरांच्या विचारांतुनी रूजते मराठी

*

जनाबाईंच्या जात्यामध्ये ओवते मराठी

मुक्ताईची ताटी उघडे अभंगी मराठी

*

आर्या मोरोपंत सांगती जनरीत मराठी

होनाजीच्या कवनामध्ये थिरकते मराठी

*

तुतारीत केशवसुतांच्या प्राण फुंकते मराठी

कुसुमाग्रजांच्या कण्यामधुनी लढविते मराठी

*

आण्णांच्या शाहिरीमधुनी स्फुरणते मराठी

पठ्ठे बापूराव कवनात जोशते मराठी

*

महानोरांच्या जोंधळ्यातले चांदणे मराठी

इंदिरेच्या काव्यातले बहरले ॠतू मराठी

*

शिवरायांच्या पोवड्यात  मर्दते मराठी

गदिमांच्या रामायणात दंगते मराठी

*

 विडंबनात अत्रेंच्या खळाळते मराठी

बालकवींच्या बागेमध्ये बागडे मराठी

*

खेबुडकरी लावणीत घुंगुरते मराठी

भटांच्याही गझलेत गुंजते मराठी

*

पु.लं.चा  जगप्रवास पेलते मराठी

शांताबाई कविता जपती संस्कार मराठी

*

चला जपूया आज वारसा जागवू मराठी

अभिमानाने मिरवूया जगी समृद्ध मराठी

© डॉ. मधुवंती कुलकर्णी

जि.सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments