सुश्री तृप्ती कुलकर्णी
कवितेचा उत्सव
☆ चा’हूल’… ☆ सुश्री तृप्ती कुलकर्णी ☆
आपल्या अंगणात
मान खाली घालून
अगदी तन्मयतेने
दाणे टिपणारे
हे पक्षी
कसल्याशा
चाहुलीने
क्षणार्धात
आपले पंख पसरवून
उडत जातात…
अन्
सुरुवातीला स्पष्टपणे
दिसणाऱ्या त्यांच्या प्रतिमा
मग हळूहळू हवेत
आपल्या अस्तित्वाच्या खुणा
सोडून देतात…
एखाद्या चित्रकाराने
मोकळ्या कॅन्व्हास वर
काही चुकार स्ट्रोक सोडून
द्यावेत तशा…
प्रिय कविते
तु ही तशीच …
नेमका तो क्षण
टिपण्याच्या वेळी
तु उडून जातेस
अन्
माझ्या शब्दांत उतरतात
केवळ
तुझ्या काही चुकार,
अव्यक्त जागा…
अन् खूप मोठं
ऐसपैस अवकाश….
© सुश्री तृप्ती कुलकर्णी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈