श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ देवा पुढती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
ज्यांच्या त्यांच्या घरात आता
ज्याने त्याने सुखी असावे
शुभंकरोती म्हणताना ही
शुद्ध तुपाचे दिवे जळाले
आठवण होता साठवणीच्या
सर्व तिजो-या खुल्या कराव्या
काळासोबत उजळत गेल्या
घटनांना ही स्पष्ट बघावे
*
कोणासोबत काय करावे
मनात सारे ठरवत जावे
जुने गीत जर आठवले तर
मनात ते ही खुशाल गावे
मिटून डोळे शांतपणाने
करून घ्यावी ध्यानसाधना
देवपुजेच्या ताम्हाणातील
कृष्णाला पण नित्य भजावे
*
देवापुढच्या निरांजनाला
पदराखाली हळू जपावे
वाया गेल्या निर्माल्याला
पुन्हा एकदा स्पर्शून घ्यावे
मनातली मग दूर करावी
नको तेवढी अडगळ सारी
काळाजातल्या कोप-यातले
दडून बसले नाव स्मरावे
*
मिटून डोळे हात जोडता
बनून कापूर विरून जावे
पद्मासन मग मोडत आसता
ओले डोळे हसत पुसावे
गंधचंदनी भाळावरचा
उपहासाने हसेल तेव्हा
मस्तक नमवून देवापुढती
बावरलेले मन आवरावे
*
मनात सुंदर गाव वसावे
म्हणून माझे ते कळवावे
काळजातला चंद्र पाहता
हसून पुढती निघून जावे
माथ्यावरच्या पदरासंगे
आपुलकीने करीत चाळा
तुळशीला मग घालत पाणी
वळून मागे पुन्हा बघावे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈