श्री हरिश्चंद्र कोठावदे
कवितेचा उत्सव
☆ त्या देशीचा सुगंध घेवुन… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆
☆
त्या देशीचा सुगंध घेवुन, फुलांत इथल्या दरवळतो
झरता झरता घननीळातुन, मातीमधुनी घमघमतो
*
सूर्यफूल मी सूर्याचे अन् चंद्रकमल मी चंद्राचे
असो उन्ह वा असो चांदणे, जीवनगाणे गुणगुणतो
*
मायावी ह्या रानी चकवा, चळतो ढळतो कधी कधी
वणव्यामधुनी मग पतनाच्या, ओघ कांचनी लखलखतो
*
कुणाकुणाला ह्रदयी घ्यावे, हतभाग्यांची काय कमी
उत्तररात्री त्यांच्यासाठी, अश्रू माझा झुळझुळतो
*
किती कुंपणे अवतीभवती, मण मण पायी बेड्याही
तरी सिद्ध मी व्यूह भेदण्या, दिगंत होण्या तळमळतो
*
दावित दावित जगा आरसा, अवचित दिसतो मीच तिथे
आत्मचिंतनी कबीर कोणी, दोहा होवुन घणघणतो!
(हरिभगिनी)
☆
© श्री हरिश्चंद्र कोठावदे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈