श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
☆ 🕺 जा ही र ना मा ! 🤣 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆
☆
जा हीरनामा सर्वच पक्षांचा
असतो एक पोकळ मनोरा,
अशक्यप्राय अशा वचनांनी
उभा करती सारा डोलारा !
*
हि तगुज करती मतदार राजाशी
त्याच्या चंद्रमौळी घरात,
भाकर तुकडा “फोटोसाठी”
खाती त्याच्याच ताटात !
*
र स्तोरस्ती काढून मिरवणूका
लोकांचा करती खोळंबा उगाच,
कर्णकर्कश्य आवाजाने होतो
फुका ध्वनी प्रदूषणाचा जाच !
*
ना ही आठवत वचननामे त्यांना
एकदा निवडून आल्यावर,
चार हात दुरून करती नमस्कार
जे आधी असायचे खांद्यावर !
*
मा मा बनतो भोळा मतदार
मतदान इमाने इतबारे करतो,
न झाल्याने वचनांची पूर्ती
पुन्हा पाच वर्षे मनी झुरतो !
पुन्हा पाच वर्षे मनी झुरतो !
☆
© प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈