श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ वैराग्य… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
केवढे हे भाग्य खोटे तू मला सोडून जावे
सारखे ध्यानीमनी मी दु:ख ते का आठवावे
*
थाटला दरबार आहे स्वागताला वंचनेच्या
वाटते या सोहळ्याला चंद्रतारे बोलवावे
*
पेटलेला देह कोठे शांत होतो सावलीला
दैवताने घात केला हेच आता ओळखावे
*
संकटे आली तरीही हात होते बांधलेले
संशयाला वाटले की माणसाला ठोकरावे
*
स्वप्न वेडे दिवस होते काळ सरला वैभवाचा
थोडके उरलेत बाकी स्पर्श तेही संपवावे
*
राहिले बाकी न काही हात झाले संत दोन्ही
बदललेल्या वास्तवाने नेमके वैराग्य यावे
*
वासनांनी जींदगीला कैद केले कैक वेळा
मुक्त तेचा काळ येता पाय गुंते सोडवावे
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈