श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 241
☆ न्याय ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
पैशा समोर जीवाची सांगा किंमत ती काय
रात्रीमध्ये श्रीमंताच्या पोरट्याला मिळे न्याय
अल्पवयीन मुलाला नको अटक व्हायला
त्याच्यासाठी पिझ्झा म्हणे होता आणला खायला
दोन मेले त्यात सांगा असं झालं मोठं काय ?
रोज निर्दयी माणसे फिरतात रस्त्यातुन
दुःख कुणाचेच कुणी नाही घेत हो जाणून
लोकशाही कुचलुन करतात ते अन्याय
खेळ चालतो नोटांचा गरिबाला कोण वाली
न्याय कसा मिळणार ज्याचा आहे खिसा खाली
नेते, बाबु, वर्दीचाही इथे फसलेला पाय
झोपलेलं कोर्ट सुद्धा त्यांच्यासाठी होतं जागं
डोळ्यांवर काळी पट्टी तरी त्याच्यावर डाग
रोग आहे भयंकर नाही काहीच उपाय
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈