श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 246
☆ अळवावरचे पाणी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
गर्दीमधल्या गोंगाटाने मी भेदरले होते
एकांताच्या कुशीत शिरले अन सावरले होते
*
शृंगाराची आवड नव्हती निरस आरसा होता
रसरसलेला मुखडा पाहुन मी गांगरले होते
*
सौंदर्याची खाण पाहुनी डोळे दिपले त्यांचे
खाणीवरती मी पदराला मग पांघरले होते
*
एक वाळवी मतभेदाची पोखरण्याला कारण
वरून सुंदर आतुन सारे घर पोखरले होते
*
वाचे इतके धरतीवरती घातक नाही काही
तुझे बोलणे इतके स्फोटक मी हादरले होते
*
भिती वाटते पक्व फळाला हलल्यावरती फांदी
फूल सहजतर फांदीवरती ते वावरले होते
*
अल्पजीवनी तरिही सुंदर या जगताला वाटे
अळवावरचे पाणी क्षणभर मोती ठरले होते
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈