श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ भेट… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆
☆
तुझी भेट ध्यानी-मनी ना तरीही
उरी चंदनाचे भरे मंद वारे
धुक्याचाच वेढा जणू भोवतीने
उधाणात जाती बुडूनी किनारे
तुझे बोलणे, संभ्रमाचेच जाळे
तुझे मौन,आकांत होई मनाचा
कधी कोरडा मेघ होऊन येशी
निळा मेघ होशी कधी श्रावणाचा
कधी लख्ख सारे उजेडा प्रमाणे
कधी वाटतो मी तमीचा प्रवासी
कधी हातचेही दुरापास्त वाटे
कधी चांदणे येतसे अंगणाशी
कसे आवरावे ऋतूंना मनाच्या
कशी भूल टाळू जिवा जी पडावी
जणू जीवनाला अश्या सैरभैरी
हवी ती दिशा नेमकी सापडावी
तुझी भेट ध्यानी-मनी ना तरीही
तुझा चंद्र का गे ढगाआड होई?
पुन्हा वेढती प्राक्तनीचे उन्हाळे
जणू अर्धस्वप्नातुनी जाग येई
☆
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈