सुश्री वर्षा बालगोपाल
कवितेचा उत्सव
☆ वर्षाधारा… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆
(राजा छत्रसाल यांनी महाराजांकडे कर्जाची मागणी केली होती आणि महाराजांनी त्यांना दान दिले आणि त्यांची अवस्था सुधारली अशी कथा आहे )
मी पावसावरील कविता लिहिताना त्यात प्रयोग म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथा त्यात कशा दिसतात हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. अशा 12 प्रसंगांवर मी कविता लिहिल्या आहेत. त्यातील एका प्रसंगावरील ही कविता….
☆
वरूणराजा तो झाला, राजा शिवछत्रपती
ढगांच्या घोड्यावर आरूढ़,गड़गडाच्या नौबती
सौदामिनीचे दाणपट्टे, सूर्यकिरणाच्या तलवारी
अशा मोठ्या दलासवे,राजा शोभे तालेवारी
*
आता आमचा बळीराजा,झाला छत्रसाल राजा
ऋण फिटता फिटेना,भेटू म्हणे महाराजा
शेत जमीन नांगरून गार्हाणे हे घातले
यथाशक्ती मदत व्हावी, मागणे हे मागितले
*
छत्रसालाने पसरले बाहू,शिवराय सरसावले
उराऊरी ते भेटताच, दैन्य सारे हे संपले
मृद्गंधाचे अत्तर लावले,थेंबांची ती पुष्पवृष्टी
धरे पासुनी आसमंतापर्यंत, सारी सुखावली सृष्टी
☆
© सुश्री वर्षा बालगोपाल
मो 9923400506
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈