श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ श्रावण गाणी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
आनंदाने घुमू लागली श्रावण गाणी
दाखवतो बळ वाराअवखळ
करतो सळसळ दारी पिंपळ
जलधारानी बरसत केले तळेअंगणी
आनंदाने घुमू लागली श्रावण गाणी
*
बरसत आल्या जलधारानी भिजली राने
मातीमधल्या नवांकुराना फुटली पाने
किमया झाली कळून आली
फुलल्या वेली फुले हासली
जिकडे तिकडे नितळ जाहले अमृतपाणी
आनंदाने घुमू लागली श्रावण गाणी
*
ऋतू राजाने चैतन्याने रंग बदलले
प्रभात काळी रविकिरणांचे तेज प्रकटले
दिशा बहरल्या नटल्या सजल्या
दिपून गेल्या लाज लाजल्या
जगण्याची मग सुरू झाली नवी कहाणी
आनंदाने घुमू लागली श्रावण गाणी
*
प्रेम लाभता जगभवताली हसू लागले
भविष्यातले आशादायी दिवस बदलले
हातीआला अमृत प्याला
मग जगण्याचा ध्यास लागला
देवाघरची कळून आली भविष्य वाणी
आनंदाने घुमू लागली श्रावण गाणी
*
किती काळजी करावयची या जगण्याची
असते चालू इथे लढाई सुखदुःखाची
संधी मिळते तेव्हा कळते
सरते उरते परत बहरते
सतर्कतेने वर्तन करता कलाकलाणी
आनंदाने घुमू लागली श्रावण गाणी
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈