1

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मनसूर्य ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ मनसूर्य ☆ सौ.अश्विनी कुलकर्णी ☆

कॅनव्हास वरील चित्रात

नेहमीच सूर्य कुठे दिसतो?

तरीही उजळतो आसमंत,

दिसतात हिरव्या ओल्या रेषा

रेषांच्या विविध छटा…आणि

ऐकूही येते खळखळ नद्यांची

आकाशाने कवेत घेतलेले पक्षी… त्यांच्या कुशीत आश्वस्त ,

वाटून घेणारे डोंगर….

 

दिसतं….

 

आकाश आणि नदीच अद्वैत…

आकाश आणि डोंगरांचे अद्वैत…

कधी झाडाचं…लता पल्लवीचं…

तर कधी साऱ्या सृष्टीचं अद्वैत….

त्या आकाशाशी!!

चित्रात सूर्य नसतानाही….

 

मग असाच एक मनसूर्य

प्रत्यक्ष प्रकट न होणारा … काळोखातूनही उजेड प्रसवणारा….

मुठीएव्हढ्या अंधारात वसलेल्या हृदयातून ,

तेजाळणाऱ्या गीतांना ताल देणारा…

तर कधी….

पान, फुल, सरिता, आभाळ होऊन त्यांना रंग नी रूप देणारा….

आणि तिमिरातूनही,

चैतन्याची वाट दाखवणारा,

आणि जीवनाच्या सुंदरतेशी,

अद्वैत करवणारा….

पडद्यामागचा कलाकार!

पडद्यामागचा कलाकार!

 

© सौ अश्विनी कुलकर्णी

सांगली  (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈