श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 254
☆ वल्लरीला भेटताना ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
पालवीला डोलताना पाहिले
अन कळीला हासताना पाहिले
ओठ मिटुनी काल होत्या बैसल्या
आज त्यांना बोलताना पाहिले
पाकळ्या एकेक झाल्या मोकळ्या
साद त्यांनी घालताना पाहिले
झाड होते एकटे रानात त्या
वल्लरीला भेटताना पाहिले
पावसाने केवढे आनंदले
मोर होते नाचताना पाहिले
आग ही पोळ्यास कोणी लावली
सैन्य सारे धावताना पाहिले
माणसाने घातलेली धाड ही
मी मधाला चोरताना पाहिले
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈