सुश्री प्रणिता प्रशांत खंडकर
कवितेचा उत्सव
☆ बोला जय जय गणराया… ☆ सुश्री प्रणिता खंडकर ☆
☆
तुझ्या दर्शने हरती विघ्ने,
जाती लयाला चिंता,
आनंदाची असे पर्वणी,
आगमन तुमचे बाप्पा!
बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!
*
पूजतो तुजला भावभक्तीने,
सान-थोर हा मेळा,
पार्थिवातूनी चैतन्याची,
देसी प्रचिती बाप्पा!
बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!
*
हात जोडूनी, नमन तुला हे,
पायी ठेवता माथा,
सकला देई विवेकबुद्धी,
विद्याधीश तू बाप्पा!
बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!
*
गोड मानूनी घ्यावे तू रे,
अर्पियले जे तुजला,
भक्तिभाव जो मनीमानसी,
ओळखीसी तू बाप्पा!
बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया!
*
चिंतन व्हावे तुझ्या गुणांचे,
ध्यास जडो ज्ञानाचा,
जाण राहू दे माणुसकीची,
माणसात तू बाप्पा!
बोला जय जय गणराया, बोला जय जय गणराया !
☆
© सुश्री प्रणिता खंडकर
संपर्क – सध्या वास्तव्य… डोंबिवली, जि. ठाणे.
ईमेल [email protected] केवळ वाॅटसप संपर्क.. 98334 79845.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈