सौ. सुनिता गद्रे

☆ कवितेचा उत्सव ☆ आई.. लेक.. आई…  (भावानुवाद)☆ सौ. सुनिता गद्रे ☆ 

माझ्या आईची एकुलती एक लेक आता आई झाली,

न जाणे कशी एका इटुकल्या पिटुकल्या ‘शेराची’ पुरी गझ़ल झाली …

 

लग्नापूर्वी बाबा म्हणायचा मुलीला आमच्या स्वयंपाक नाही करता येत आणि तिला आवडही नाहीय,

जिला डाळी डाळीतला फरक पण माहित नव्हता न जाणे कशी ती एका मोठ्या कुटुंबात हँड्स-ऑन-शेफ झाली…

 

लक्षात आहे लग्नानंतर ती म्हणाली होती आई नवे गाव नवे लोक नवे ऑफिस नवे घर,

माणसांच्या प्रचंड गर्दीत पण खूप एकटं एकटं वाटतं,अन् न जाणे कशी आज ती एकटीला दोन पळ स्वतःसाठी मिळावेत म्हणून रात्री तीन वाजता उठून चहा पिऊ लागली…

 

म्हणाली होतीस आई तू ,खूप मोठं स्वप्न असतं आपल्या मुलांच्या लग्नाचं आणि ती हसली होती….

पण आपल्या सहा दिवसाच्या छकुलीला हॉस्पिटलमधून घरी आणताना ती न जाणे कशी छकुलीच्या लग्नाच्या विचारापर्यंत  जाऊन पोहोचली…..

 

मॅचींग शुज नाहीत,एरिंग्ज फनी आहेत, हे बघ कुर्तीची कशीअजब फिटिंगआहे. कित्ती तुला भंडावून सोडत होती ती.

न जाणे कशीआज कोणतीही सलवार, कसली ही कुडती, त्यावरऑड वाटणा-या ओढणी सहित ती बिंदास घराबाहेर पडू लागली…

 

जिच्या खाण्यापिण्याचे शेकडों नखरे होते. आई कसलं बेचव जेवण करतेस, बिर्याणी आणि मुगाच्या डाळीची खिचडी सगळंच एकसारखं लागतं,

न जाणे कशी ती आज सगळ्यांना करून वाढता वाढता फोडणीचा भात होऊन गेली….

 

रोज बडबड करून तुला सगळं काही सांगायची,

लक्षात आहे जेव्हा तिनं पहिल्यांदा विमान प्रवास केला तेव्हा टेक ऑफ  पासून लँडिंग पर्यंतचा व्हिडिओ सुध्दा तुला पाठवला होता….

पण  न जाणे कशी तुला वाईट वाटू नये म्हणून आपल्या हसण्या मागं असलेली दुःखं ती लपवून ठेवायला लागली…

 

कधी तू म्हणाली होतीस पहिल्यांदा स्वतःची काळजी, नंतर इतरांची,

पण न जाणे कशी घरादाराची चिंता प्रथम आणि तिची आपली चिंता शेवटची झाली……

 

न जाणे कशी एका इटुकल्या पिटुकल्या’ शेराची’ पुरी गझ़ल  झाली,

माझ्या आईची एकुलती एक लेक आता मोठ्या कुटुंबाची आई झाली…….

 

मूळ कवयित्री: सुश्री निहारिका मिश्रा

भावानुवाद : सौ सुनीता गद्रे, माधवनगर सांगली, मो 960 47 25 805.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments