श्री अशोक श्रीपाद भांबुरे
अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 258
☆ चांदण झूला… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆
☆
किती येउदे दुःखे त्यांना शिंगावरती घेऊ
बुडणाराला उडी मारुनी काठावरती घेऊ
*
मी नेत्याचा दास कोडगा कायम श्रद्धा त्यावर
घोटाळेही केले त्याने अंगावरती घेऊ
*
दोघामधला सूर ताल जर कधी बिघडुनी गेला
समजुतीने पुनःश्च त्याला तालावरती घेऊ
*
सुगंध मोहक या देहाला वेड लावतो आहे
प्रेमापोटी गुलाबास त्या ओठांवरती घेऊ
*
होय शिवाचे शूर मावळे तलवारीशी खेळू
नात्यामधल्या गद्दाराला भाल्यावरती घेऊ
*
तुकडे तुकडे करणारे हे नकोत नेते आम्हा
देशासाठी झटेल त्याला डोक्यावरती घेऊ
*
चल वस्तीला जाऊ तेथे असेल चांदण झूला
एक देखणा असा बंगला चंद्रावरती घेऊ
☆
© श्री अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈