सौ. अर्चना गादीकर निकारंगे
कवितेचा उत्सव
☆ प्राजक्त… ☆ सौ. अर्चना गादीकर निकारंगे ☆
☆
बागेत तो इतर झाडांबरोबर दिसत होता ,
जागोजागी आलेल्या पांढर्या नाजूक फुलांनी शोभत होता ,
त्याचा मधुर सुगंध सर्वत्र येत होता ; सर्वांना स्वतःकडे आकर्षित होता .
फांद्यांच्या अग्रा – अग्रांना आलेली नाजूक फुले
पडून गेलेल्या पावसाच्या थेंबाप्रमाणे वाटत होती ,
अगणित जन्मलेली अशी डोळ्याला खूप सुखावून जात होती .
गवतावर पडलेला त्यांचा मोठा खच ,
झाडाची उदारता जणू दाखवत होता .
फुले पाहून वेचायला आलेल्या प्रत्येकाला ,
त्याने त्यातून उदारतेचा धडा दिला होता .
उदारतेतील आनंद उपभोगत होता ,
त्यामुळेच त्याला रोज बहर येत होता ,
उद्याचे काय ? हा विचार करत नव्हता
त्यानेच की काय तो आनंदित होता .
☆
© सुश्री अर्चना गादीकर निकारंगे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈