श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पुन्हा एकदा… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

तुझी आठवण मनी उतरली पुन्हा एकदा

ग्रीष्म कधी श्रावण-सर झरली पुन्हा एकदा

*

बोलायाचे बरेच काही गेले राहुन

शब्दांची पाखरे बिथरली पुन्हा एकदा

*

शुक्राची होऊन चांदणी उगवलीस तू

पहाट रात्रीला फटफटली पुन्हा एकदा

*

ठेवताच तू तळहातावर फूल जुईचे

ओंजळ ही स्वप्नांनी भरली पुन्हा एकदा

*

तुझे वागणे नाटक आहे पक्के कळले

पण फसलो जेंव्हा तू हसली पुन्हा एकदा

*

पुन्हा तुझ्या येण्याने फुललो विसरुन सारे

घडी मनाची मी अंथरली पुन्हा एकदा

*

परतलीस नि:शंक मनाने लाटेसम तू

खूण प्रितीची अपुल्या पटली पुन्हा एकदा

*

तुझे मेघ आषाढी, वा-यासवे पांगले

हिरवटती आशा कोळपली पुन्हा एकदा

*

शांत सागरी जीवन-नौका होती माझी

भेटलीस तू अन् वादळली पुन्हा एकदा

*

नांव तुझे नकळतसे येता ओठांवरती

जखम वाळलेली ठसठसली पुन्हा एकदा

*

आठवणीतुन भेटलीस तू अवचित जेंव्हा

मजला ‘माझी’ भेटहि घडली पुन्हा एकदा

*

तुझी आठवण, अर्ध्यामुर्ध्या भातुकलीची

हसताना आसवे निसटली पुन्हा एकदा

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments