महंत कवी राज शास्त्री
हे शब्द अंतरीचे # 201
☆ कपाट… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆
☆
बंद कपाटाच्या ओठांवर
श्वास कुठला गुंतला आहे?
स्मृतींच्या धुळकट पानावर
विस्मृतीचा तुटला भाव आहे.!!
उघडले की वास जुना
काही गुपित सांडलेले
आठवणींची पत्रे जुनी
काळजाच्या घडीत गुंफलेले.!!
कधी पुस्तकांची गर्दी
कधी कपड्यांची शिस्त
पण आत कुठेतरी लपली
न पाळलेल्या कर्तव्याची भिस्त.!!
कधीतरी हात फिरवताना
एखादा स्वप्नमेख लागतो
बंद दाराआड दडलेला
काल पुन्हा हुंदका देतो.!!
कपाट म्हणजे केवळ सामान
का काळाचा एक ठेवा?
उघडले तर आठवणींचा सागर
बंद केले तर मौनाचा मेवा.!!
काळवंडले जुने कपाट
स्तब्ध उभा कविराज
पाहुनी त्याची ही व्यथा
हलला अंतःकरणाचा राज!
☆
© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री
श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005
मोबाईल ~9405403117, ~8390345500
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈