सौ. ज्योती कुळकर्णी
कवितेचा उत्सव
☆ वसंत ऋतुच्या शुभेच्छा ..☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆
(अष्टाक्षरी)
☆
वसंताला येता भर
वारा हळुंच झुलतो
गुलाबाच्या कळीसह
गीत प्रणयाचे गातो
*
आनंदाने डोलणार्या
कळीसवे बागडतो
उद्या पूर्ण फुलण्याचे
स्वप्न तिला दाखवतो
*
फुलणार्या कळीसंगे
झिम्मा फुगडी खेळतो
चार दिवस सुखाचे
आनंदाने घालवतो
*
एक फुल कोमेजते
दुजे सुरेख खुलते
भुंग्याचाही गुंजारव
कळी डौलात डोलते
*
वसंताचा जाई थाट
रोपे बनती उदास
ग्रीष्म करतो कहर
वर्षा देई पुन्हा श्वास
*
ऋतुराज पावसाळा
येतो जरी सालोसाल
दरवर्षी आनंदाचे
वाण वाटे हरसाल
☆
© सौ. ज्योती कुळकर्णी
अकोला
मोबा. नं. ९८२२१०९६२४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈