श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ झेप घेतसे पाखरु ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
(कुटुंबातील मुले कर्तृत्ववान होताना आईच्या भावना)
☆
हासू कसले आसू कसले नका विचारु कुणी
एक पाखरु झेप घेतसे पंख नवे लावुनी
*
उरातली ही धडधड माझ्या नकोस ऐकू बाळा
अजून माझ्या कानी घुमतो तुझाच घुंगुरवाळा
बघू नको तू मागे आता, ‘आई, आई’ म्हणुनी
एक पाखरु झेप घेतसे पख नवे लावुनी
*
अंगण सोडून नभांगणाचा ध्यास तुला लागला
निरोप तुजला देताना परि दाटून येतो गळा
खुशाल जा तू सोडून माया, ठेवून आठवणी
एक पाखरू झेप घेतसे पंख नवे लावुनी
*
दूर यशाचे शिखर खुणविते, गाठायाचे तुला
काटे वेचुन कर्तृत्वाचा फुलवायाचा मळा
वाटेवरुनी चालत जा तू ध्येय एक ठेवुनी
एक पाखरु झेप घेतसे पंख नवे लावुनी
*
असेच येतील अश्रू नयनी तू परतून येता घरी
ओठही हसतील झेलत असता तुझ्या यशाच्या सरी
मायपित्याचे आशिर्वच जा, सोबतीस घेउनी
एक पाखरु झेप घेतसे पंख नवे लावुनी
☆
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈