सुश्री अपर्णा परांजपे
कवितेचा उत्सव
☆ गंगासागर…. 💧🌊💧 ☆ सुश्री अपर्णा परांजपे ☆
☆
कडे कपारी कापत कापत
का पुढे धावते?
नितळ निर्मळ रुप असोनी
का चिखल झेलते?
थांबून स्तब्ध मी तळे न रहाता
पुढे पुढे चालते
वाटेवरल्या तहानलेल्या जीवास तृप्त करते
जीवन दान हे देत असता
कर्तव्य पूर्ती करणे
खाच खळगे काही न त्याचे परोपकारी जीवन करणे
माझे माझे मी मी करूनी
तळे बनावे का?
देतच रहावे असे करोनी
कल्याण करावे का?
प्रश्न नाही उत्तर नाही
फक्त पुढे जायचे
ही धाव ही आतून असते
न्यून न घडायचे..
मार्ग खडतर तरीही सुखमय
गती अशी पकडता
सुखमय वाटे प्रवास केवळ
निर्विकार असता…
ओढ कशाची काही नकळे केवळ पुढे धावता
प्रशांत जलाशय समोर दिसता भय वाटे चित्ता
काय करावे कसे करावे मार्ग मागचा नाही
पुढे जलाशय उभा ठाकला
बुध्दी चालत नाही.
आत शिरावे दुसरे काही अस्तित्वच नाही
मी माझे जे काही आहे
शिल्लक काही नाही..
पुढे चालणे हे जे जीवन
चूक का असावे वाटे
रत्नाकर मज खुणावतो ही
सार्थकताही वाटे
विलीन होणे दुसरा मार्ग न माझ्यापुढती आता
हतबलता ही नाही मात्र
कृतकृत्य वाटे आता…
खडतर वाटा पार कराव्या का वाटत होत्या
न दिसणारा बलाढ्य सागर
आतुर वाटे आता..
देता देता प्रवास होता
माझे मज दिसले
धाव कशाची होती माझी
आज मला कळले..
मी मी करून देता देता
अभिमान उरी ठसला
समोर सागर उभा ठाकला
अभिमान गळोनी पडला..
भय दाटले मनात किंचित कसे शिरावे कवेत
माझे मी पण क्षणात संपून
जाईल त्याच्या आत..
केलेल्या उपकाराची फेड करण्या ही सुसंधी खरी
निर्विकार होऊनी घेतली
क्षणात समुद्री उडी..
मी न सरिता आता मर्यादित जलप्रवाह
अमर्याद विस्तीर्ण जलाशय
प्रशांत नीरव स्तब्ध..
गोड असोनी विलीन होऊन
खारट झाले आता
सामान्यातून असामान्याचा हा प्रवास थांबला आता…
फक्त किनारी सुख पेरणे गौण वाटले आता
पूर्ण जगाची तृष्णा रिझवू
मिळून “सागर सरिता”…🌧️
☆
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈