कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 242 – विजय साहित्य
☆ राजे आमुचे शिवाजी..! ☆
(अष्टाक्षरी रचना)
☆
साल सोळाशेचे तीस
एकोणीस फेब्रुवारी
जन्मा आले शिवराय
गडावर शिवनेरी….! १
*
शिव जन्मोत्सव करू
शौर्य तेज कीर्ती गाऊ
माय जिजाऊंचे स्वत्व
रूप स्वराज्याचे पाहू..! २
*
किल्ले रायरेश्वरात
स्वराज्याची आणभाक
हर हर महादेव
शूर मावळ्यांची हाक…! ३
*
असो पन्हाळीचा वेढा
वध अफ्झल खानाचा
आग्र्याहून सुटकेचा
पेच प्रसंग धैर्याचा…! ४
*
वेगवान हालचाली
तंत्र गनिमी काव्याचे
युद्ध,शौर्य,प्रशिक्षण
मूर्त रूप शासकाचे…! ५
*
लढा मुघल सत्तेशी
स्वराज्याच्या विरोधका
शाही आदिल कुतुब
नष्ट गुलामीचा ठसा…! ६
*
नौदलाचे आरमार
शिस्तबद्ध संघटन
अष्ट प्रधान मंडळ
प्रजाहित प्रशासन…! ७
*
रायगडी अभिषेक
स्वराज्याचे छत्रपती
राजे आमुचे शिवाजी
हृदी जागृत महती…! ८
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈