कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 246 – विजय साहित्य
☆ राम कवन स्तवन…! ☆
मालिनी वृत्त.
(करुणाष्टक)
☆
दशरथतनय ज्याची,
जाहली वंद्य कीर्ती.
रघुकुलतिलक आजी,
भावली बालमुर्ती.
उचित समय येता,
धावला मोक्ष दाता.
दशरथ सदनासी,
जन्मला राम ध्याता…!१
*
फुलवित पालवीला,
गुंगला वात जेथे .
घडवित बाल लिला,
जन्मला राम तेथे.
चरणकमळ रामा,
देतसे सौख्य छाया.
नमन तुजदयाळा,
पाव रे राम राया…! २
*
अचपळसकळ लीला,
सावळी दिव्य कांती.
नवकमलदल नेत्री,
दाटली विश्वशांती.
अवघड पण साचा,
भंगला चाप आर्या.
जनक सुनयनाची,
कन्यका राम भार्या…!३
*
वचन चरण साक्षी,
थांबले भाग्य जेव्हा
भरतसदन गेही,
नांदले सौख्य तेव्हा.
निजसुख टाळणारा,
राम बंधू मिळावा
सकलसौख्य दायी,
राम चित्ती वसावा…! ४
*
कवन स्तवन वंदू,
राम नामा मुखाने.
हसत हसत नेतो,
पार नौका सुखाने.
करकमल जयाचे,
वंदितो नित्य धामी.
शरण तुज दयाळा,
धाव रे चक्रपाणी…! ५
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈