☆ कवितेचा उत्सव ☆ धरा – अंबरा ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
कैवल्यदानीच्या दोन पोरट्या धरा,अंबरा
समंजस हि धरा,अंबरा परि खळखळणारी॥
म्हणे अंबरा, ” नेसू माझे कधी काळे तर कधी राखाडी
क्वचितच असते रेष त्यावरी लखलखणारी”॥
नच खळेना डोळ्यामधले पाणी हळवे
कधी करी आकांत तर कधी मुसमुसणारी॥
रंगबिरंगी फुलवेलींची नक्षी रेखली
धरेस मिळते हिरवी साडी झगमगणारी॥
अखेर थोडी हसली गाली आज अंबरा,
नेसून दावी पिवळी साडी सळसळणारी॥
चैतन्याने रात भारली प्रणयरंगी
काळी साडी, खडी त्यावरी चमचमणारी॥
मनोमनी तो आज लाजला, चकोर भोळा
लख्ख प्रकाशी, बघून अंबरा थरथरणारी॥
© सौ.मंजिरी येडूरकर
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
अर्थपूर्ण सुंदर रचना
उत्कृष्ठ कल्पना मात्र समजायला थोडी कठीण. पहिलीच ओळ वाचकाला बुचकळ्यात पाडणारी. नंतरचा पावसाळा, उघडीप आणि टिपूर चांदणी रात्र देखिल कळायला तितकेसे सोपे नाही. शेवटची अंबर आणि चकोर यांच्या प्रणयाची कल्पना अत्यंत नाविन्यपूर्ण, चकित करणारी.