☆ कवितेचा उत्सव ☆ श्याम गझल – त्याच वाटा तीच वळणे ☆ श्री सोमनाथ साखरे ☆
उधळून रंग काही रिझवून शाम गेली
या कोरडेपणाला भिजवून शाम गेली.
गजगामीनी अशी की लय-ताल चालतांना
श्वासात पावलांच्या थबकून शाम गेली.
मौनातही सखीच्या भावुक बोल काही
मिटवून अधर ऐसें सुचवून शाम गेली.
गुज बोललो गुलाबी कानात मी सखीच्या
ऐकून अनुभवाचे शरमून शाम गेली.
आकाश चांदण्यांनी हळुवार गोंदतांना
भारावल्या दिशांना उजळून शाम गेली.
ती बावरी सखी की राधाच श्रीहरीची
या सावळ्या घनाला समजून श्याम गेली.
गजऱ्यात मोगऱ्याच्या लपवून गंध काही
दिलदार शायराला भुलवून शाम गेली
© श्री सोमनाथ साखरे
नाशिक..
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈