प्रा.सौ. सुमती पवार
ई-अभिव्यक्ती परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन’
☆ कवितेचा उत्सव ☆ हा सृष्टी नेम आहे…. ☆ प्रा.सौ.सुमती पवार ☆
सांगू किती तुला मी फुल येते ग फुलून
रात्रीतली कळी ती पहाटेस उमलून
होती फुले कळ्यांची हा सृष्टी नेम आहे
थांबला ना कधीच चुकला कधी न आहे…
येणार ढग काळे कडकडाट ही विजांचा
ताशा ही वाजणार आकाशी तो ढगांचा
धो धो बरसूनी तो होणार रिक्त आहे
पडणार ऊन स्वच्छ हा सृष्टीनेम आहे….
क्षितीजावरी धुक्यात पटलात सूर्य जाई
लोपून डोंगरात तो दृष्टी आड होई
येणार रात्र काळी टळणार ते का आहे
प्राचीवरी पहाटे रवी प्रकटणार आहे…
ऊन तप्त तापलेले काहील ही जीवाची
झेलून दु:ख्ख घ्यावे वहिवाट ही जगाची
सुखदु:ख्ख समेकृत्वा ही भोगयात्रा आहे
चुकणार नाहीच ती हा सृष्टीनेम आहे….
हासून ते जळावे दुज्यास ना कळावे
जे जे जमेल तितके सोसत हो रहावे
जे भोगणेच प्राप्त का व्यर्थ हो कुढावे
प्राक्तन सोबतीला हा सृष्टी नेम आहे …..
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
दि : ०७/०८/२०२० वेळ : रात्री ११:०४
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈