प्रा. सौ. सुमती पवार
? कवितेचा उत्सव ?
☆ तगमग… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆
वेदनांचे सल आता कोंभ झाले देवा
खुड ना वेळीच त्यांना,घालू नको हवा …
नको करू मोठे त्यांना,जेरीस आले जग
विश्वभर सारी देवा, तग मग तग मग …
तुझ्या घरातला प्राण,प्राणवायुच संपला
कुबेराचा धनसाठा असाकसा हरपला ?
वटवाघळेच जणू, घरोघरी विसावली
अशी कशी बनली रे, विष झाली ही साऊली ?
लाटांवरी येती लाटा, भुई सपाट करती
अशी कशी कर्मगती, अशी कोणती रे नीती ?
जीव घालून जन्माला, का रे असा भिववतो
तुझे तांडव पाहता, जीव मेटाकुटी येतो….
जीवापासून तू जीव, प्रेमपाश गुंफियले
एका बीजापासूनी तू, विश्व सारे निर्मियले
एवढी का वक्रदृष्टी,तुझा एवढा का कोप?
साऱ्या दुनियेची पहा,कशी उडविली झोप
कसे समजावू तुला?जाता आपुले माणूस
आरपार जातो बाण,दु:ख्ख बनते रे विष
वाताहत घरोघरी,इतका तू अमानुष
गाव गाव पछाडले,जणू पोखरते घूस …
थयथयाट हा तुझा, देवा पचतच नाही
लेकरांना मारते ती, कशी असेल रे आई?
सारा संसारच तुझा,कर बाबा मनमानी
आम्ही सांगणारे कोण?….
साऱ्या विश्वाचा तू धनी ….
© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक
(९७६३६०५६४२)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈