डाॕ संगीता गोडबोले
? कवितेचा उत्सव ?
☆ क्वारंटीनचा अखेरचा दिवस .. ☆ डाॕ संगीता गोडबोले ☆
बाहेर पाऊस पडतोय ..
आचके दिल्यासारखा ..
उगीचच कावायला झालं ..
अरे पड की जरा रपारपा ..
घे जरा मोठा श्वास ..
आणि सोड जोराने ..
आॕक्सिजन लेव्हल वाढायला नको का?
पाऊस भांबावलेला ..
म्हणजे ..
मी नक्की काय करायचं ?
या प्रश्नासरशी ..
दचकून बाहेर पाहिलं
खिडकीतून ..
खरंच ..
मला नेमकं काय सांगायचं होतं ?
आणि नेमकं कुणाला ?
मजेनं रमतगमत येणाऱ्या पावसाला ?
की सगळे प्रयत्न करुनही आॕक्सिजन लेव्हल कमीच रहाणाऱ्या ..
त्या कुणाला ?
पाऊस भेदरुन बिचारा..
पुरताच थांबला ..
वर आभाळ गच्च गच्च भरलेलं ..
डोळ्यांच्या कडांचा उंबरठा ओलांडायचं धाडस न करता ..
अडलेला पाऊस ..
तो ही तसाच ..
सारंच अंधुक ..अंधारलेलं ..
आतून भरून आलंय ..
पुन्हा कधी दिसणार माझं घर ?
हे असं ..
‘सगळे’ असूनही ..
वाट्याला आलेलं एकाकीपण ..
सगळीच उलथापालथ..
आयुष्याची ..
नात्यांची ..
सावरायला वेळ द्यायला हवा ..
होईल स्थिरस्थावर कदाचित ..
ढगांनी ओथंबून तरी किती काळ रहावं ?
पुन्हा एकवार रिमझिमता पाऊस ..
आनंदाचा वर्षाव करणारा ..
आॕक्सिजन लेव्हलही ..
नाॕर्मल झालीय
डोळ्यांच्या कडांचं ..
पाण्याच्या थेंबांचं ओझंही ..
नाहीसं झालंय .
कोव्हिडला हरवण्यात यश आलय ..
बस्स ..आत्ता ..इतकंच पुरेसं आहे .
शब्दसखी
© डाॕ संगीता गोडबोले
कल्याण .
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈
खूपच सुंदर शब्दांकण