श्री सुहास रघुनाथ पंडित
कवितेचा उत्सव
☆ गुलाल ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
मोहरला,खुलला,फुलला
अंगणी गुलाल उधळला.
पेटून उठली अग्नीफुले
हिरव्या पानामधून ज्वाळा
धगधगता हा यज्ञकुंड
जणू नीलमंडपी सजला
अंगणी गुलाल उधळला
कोण चालली युवती अशी
सोडून गुलाबी पदराला
की स्वाराच्या पागोट्यासम हा
वार्यावरती फडके शेला
अंगणी गुलाल उधळला
लाल पताका फडकावीत
हा खुणवितो वसुंधरेला
जणू मेघांची येता चाहूल
पायघड्या हा घालीत आला
अंगणी गुलाल उधळला
लाल चुटूक ओठ कुणाचा
उगीच कसा तो आठवला
लाल गुलाबी रंगामधूनी
प्रतिक प्रीतिचा बहरला
अंगणी गुलाल उधळला
हा खुलला,फुलला आणिक
हा मुक्तपणाने उधळला
जणू उषेचा रक्तवर्ण हा
संध्येसाठी लेऊन बसला
अंगणी गुलाल उधळला
मोहरला,खुलला,फुलला
अंगणी गुलाल उधळला.
© श्री सुहास रघुनाथ पंडित
सांगली (महाराष्ट्र)
मो – 9421225491
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈