☆ कवितेचा उत्सव ☆ असावा कोणी दुर्योधन ☆ श्री शुभम अनंत पत्की ☆
जाणून घ्यावी एकसूत्री
सधन असो वा निर्धन
कर्णाची साधण्या मैत्री
असावा कोणी दुर्योधन
तिरस्कार असे सोपा
स्वीकार असे दुर्लभ
शेवटी होई समाजप्रिय
मनुष्य असो वा गर्दभ
मैत्री पाहिली त्याने
नाही पाहिला वेश
मैत्री प्रती कर्तव्याने
बहाल केला अंगदेश
असला जरी सूर्यपुत्र
केला त्याग मातेने
वाचवण्या देवेंद्र पुत्र
साधला स्वार्थ देवाने
जेष्ठ कुंतीपुत्र असण्याचा
झाला जेव्हा साक्षात्कार
धर्मापुढे अभेद्य मैत्रीचा
झाला भव्य सत्कार
त्रिखंड गाजवित तो
आला जेव्हा कुरुक्षेत्री
युद्ध खेळला ऐसे तो
वसला अनुजांच्या नेत्री
पडला जेव्हा मृत्युमुखी
तेथेच हारले कौरवजन
होते पांडवजन सुखी
दुःखी होता दुर्योधन
लाभण्या ऐसा सखा
पुण्य असावे निरंजन
होई नेहमी पाठीराखा
असावा कोणी दुर्योधन…
© श्री शुभम अनंत पत्की
7385519093 /9284656466
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈
मित्र महात्म्य ????