मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जाण मानवा… ☆ श्री आनंदहरी

? कवितेचा उत्सव ?

☆ जाण मानवा… ☆ श्री आनंदहरी ☆

जाण मानवा, जाण अजूनही, तुझे ना काही येथे

येणे, रमणे आणिक जाणे, विश्वस्ताचे नाते    

 

तुझ्या ना हाती इथले जगणे, आज उद्याचे काही

निसर्ग येथे  लिहीत असतो, किर्द खतावणी वही

जमा तुझी ना, खर्च तुझा रे, सारे इथेच राहते

 

माझे ssमाझे गिरवत राहसी, आयुष्यात तू ओळी

तुला न कळते देईल नियती क्षणी कोणत्या झोळी

जीवनाची या जाण गंगा, सुकते,भरुनी वाहते

 

प्राण तुझिया देही असता, जगत सोयरे सारे

नश्वर काया, लोभ उगा का, वृथा वाहसी भारे

काळाच्या या जात्यामध्ये अवघे भरडुनी जाते

 

डोक्यावरचे छप्पर तुझे हे, नसते तुझ्या रे हाती,

पैसा अडका, नाती-गोती क्षण काळाचे सोबती

 नको अहं रे फुका कशाचा, होत्याचे नव्हते होते

 

स्वार्थाची अन भेदाची का जपशी भावना उरी

उधार घेतल्या श्वासांची तुज, वाटे का मनसबदारी ?

मातीतून येते दुनिया सारी,मातीतच मिळुनी जाते

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈