सौ.ज्योत्स्ना तानवडे
कवितेचा उत्सव
☆ ॐ नम: शिवाय ! ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆
सदा तुला प्रार्थिते मी
सदाशिवा शंभो हरा
करी जगाचा उद्धार
त्रिपुरारी हे शंकरा !!
समुद्रमंथन झाले
रत्नांमध्ये विष आले
प्राशुनी ते विष सारे
भूमंडळास रक्षिले !!
तप केले भगीरथे
गंगा आणण्या भूवरी
तिचा आवेग रोखण्या
धारिले तू जटेवरी !!
डळमळे भूमंडळ
तुझ्या रुद्र तांडवाने
भावनांचे नियमन
केले या नटराजाने !!
लयतत्व तूची देवा
विश्व नियमन करी
रंजल्या-गांजल्या वरी
कृपाछत्र नित्य घरी !!
ॐनमः शिवाय कथिते
वंदुनिया तव पायी
देई आशिष कृपेचा
ध्यान लागो तुझे ठायी !!
© सौ.ज्योत्स्ना तानवडे
वारजे, पुणे.५८
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈