सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ रक्ष्राबंधन☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆
(सीमेवरील भावांसाठी)
वीरपुत्र तू भूमातेचा
लढत राहसी सीमेपाशी
रक्षण करण्या माॅं भगिनींचे
तळहाती घेऊनी शिराशी
नाही तुला प्राणांची पर्वा
पहाड बनुनी उभा ठाकसी
चारी मुंड्या चित करुनिया
शत्रूला तू पाणी पाजीसी
छातीवरती घाव झेलिले
थंडी वारा सर्व साहिले
किती रिपू तू गारद केले
आनंदाने प्राण अर्पिले
सण आला राखी पुनवेचा
पाठविते धागा प्रेमाचा
मनगटी तुझिया बांधुनिया
पाठीराखा तू भगिनींचा
वीर सैनिका भाऊराया
राखीचे हे अतूट बंधन
सीमेवरती पेटून उठला
पावन माती पावन जीवन
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈