सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ सागर हाच बंधू… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे☆
सागर हाच बंधू माझा,
आहे अपार अथांग !
बहिण भावाच्या मायेचे
तेच आहे अंतरंग !
श्रावणाचा उत्कट बिंदू,
असे नारळी पौर्णिमा !
सागराला भरती येई ,
जाणू त्याचा मनी महिमा!
नात्याची या साद आहे ,
आधार हाच बहिणीचा !
सागरा सम अनंत आहे,
रेशीम धागा या नात्याचा !
रेशीम धागा गुंफून घेई,
स्नेहल नाते बंधू भावाचे!
मृदु, चिवट रेशीम धागे,
बंध बांधती दोन मनाचे!
नात्याचे हे गुळखोबरे,
एकजीव शिताशितात..
गोडी त्याची असे अवीट,
तृप्ती देई मनामनात…
© सौ. उज्वला सहस्रबुद्धे
पुणे (महाराष्ट्र)
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈