सौ .कल्पना कुंभार
कवितेचा उत्सव
☆ हळवे बंध… ☆ सौ .कल्पना कुंभार ☆
नाते बहीण भावाचे
मायेच्या धाग्यात गुंफले..
गोफ रेशमी हे प्रेमाचे
अलवार राखीने बांधले…
अल्लड अवखळ तरीही सजग
किती रंग ते नात्याचे..
क्षणांत भांडण क्षणात सांधण
निर्व्याज बंध हे प्रीतीचे…
भरभक्कम आधार भावाचा
जणू वडिलांचे प्रतिरूप..
आईच्या मायेने बहीण ही
सांभाळते भावाला खूप..
संकट येता सावराया
धावत येतो भाऊराया..
भावाच्या पाठीशी ही
असते
बहिणीची खम्बीर छाया..
बालपणीचे पहिले सवंगडी
या नात्याची अवीट गोडी..
भाऊबीज..रक्षाबंधनाची ओढ वेडी
मनामनाचे हळवे बंध जोडी…
© सौ .कल्पना कुंभार
इचलकरंजी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈