☆ कवितेचा उत्सव ☆ माझं जगणं ☆ सौ.वंदना अशोक हुळबत्ते ☆
पापभीरू मी
स्वत:च्या सावलीला घाबरतो
पण पायरी धरून जगतो
अर्धा भाकरीत चंद्र शोधतो
तृप्तीने ढेकर देतो
जर कधी गजरा आणला
जाऊन येतो मनाने काश्मिरला
हक्काच्या छप्परासाठी झिजतो
कर्जाच्या वेताळाला पाठीवर घेतो
रोजच्या जगण्याला भिडतो
समाधानाची फोडणी देतो
मुलांसोबत गोकुळात रमतो
जन्मदात्याच्या सेवेत
विठूरुखुमाई शोधतो
आणि
सुखाच्या कल्पनेला
मोत्यांची झालर लावून
दाराला तोरण बांधतो
घराला घरपण देत
माझं जगणं जगतो
© सौ.वंदना अशोक हुळबत्ते
मो.९६५७४९०८९२
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈