सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे
कवितेचा उत्सव
☆ आगमन! निसर्गाचे-गणेशाचे! ☆ सौ.उज्वला सुहास सहस्त्रबुद्धे ☆
सरत्या श्रावणाने,पावसाला सोडलं!
रंगीबेरंगी इंद्रधनुष्य आभाळात
अवतरलं!
झिमझिमणार्या पावसाने,
विश्रांती घेतली,
अन् पाखरांची पहाटगाणी,
झाडावर फुलली!
निरागस प्राजक्ता ने,
सडा अंथरला,
प्राजक्ती देठांचा,
रंग उधळला!
चिमुकली जुई,
दवबिंदू नी थरथरली,
तर धीट मोगरा,
सुगंध पसरत हसला !
कर्दळीच्या रोपांवर,
शालीन ,शेंदरी सौंदर्य दाटले,
अन् जास्वंदीने आपले
नवरंग दाखविले!
गौरी च्या पूजेसाठी,
रानोमाळ पसरला तेरडा,
शंकराच्या पिंडीवर,
डुलला सुगंधी केवडा!
निशी गंधाची हजेरी,
कुठे ना चुकली,
गणेशाच्या स्वागतासाठी,
सारी फुले सजली!
फुलांच्या दरवळाने,
गौरी गणेश प्रसन्न झाले,
सुगंध,तेज घेऊन,
महिरपीत रंगले!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित / सौ. मंजुषा मुळे ≈