सौ राधिका भांडारकर
कवितेचा उत्सव
☆ करी स्वागत गणरायाचे..! ☆ सौ राधिका भांडारकर ☆
गजवदना गणराया
स्वागत तुझे मजदारी
बांधीले तोरण सजले मखर
रांगोळी रेखली रंगभरी
नयनातल्या पंचारती
ह्रदयातले लेझीम घणघण
लेउन स्वागता तुझ्या
आनंदाने ऊसळतो कणकण..
सारीतो विवंचना सार्या
नको भयाची छाया
मिटून मुक्त चिंता आवरी
विश्वासूनी विनायका तुझीच माया…
तबकात मांडली रक्तपुष्पे
हळद कुंकवाचे करंडे
सहस्त्र दुर्वांची जुळली जुडी
मोदकासवे केले पुरणांचे मांडे
चौसष्ट कलांचा अधिपती
प्रथमेशा बुद्धीदाता
हेरंबा शिवपुत्रा
तुजविण आम्हा कोण त्राता…..
दशदिनीचा पाहुणा तू
तुजसाठी बाप्पा मोरया
भावे रचीला पाहुणचार
सत्वर उतरा मानवा रक्षाया….
करु रक्षण सृष्टीचे
सत्यासाठी झिजवू कुडी
नको आम्हा माडी गाडी
अधर्माची करुन कुरवंडी
वाहीन ही दुर्वांची जुडी…
सौ. राधिका भांडारकर
पुणे
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈