मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रार्थना… ☆ सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे

सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे

अल्प – परिचय 

नाव: सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे

शिक्षण : बी. कॉम., एम. ए. (अर्थशास्त्र आणि मराठी)

प्रकाशित पुस्तके :

(१) भावनांच्या हिंदोळ्यावर (ललितगद्य) (२) अनुबंध (ललितगद्य ) (३) मिश्किली ( विनोदी लेखसंग्रह )  (४) चंदनवृक्ष ( चरित्रलेखन ) (५) भावतरंग ( काव्यसंग्रह )

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रार्थना… ☆ सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे ☆ 

(वृत्त – प्रियलोचना)

चौदा विद्या चौसष्ठ कला, साऱ्यांचा तू अधिपती

शोध मूळ तू या विघ्नाचे निवार संकट गणपती

 

लेझीम ढोल ताशा वाजे खेळ चालले मुलांचे

किती नाचले सारे पुढती बंधन नव्हते कुणाचे

फिरूनी पुन्हा यावे दिन ते नाचू तुझिया संगती

शोध मूळ तू या विघ्नाचे, निवार संकट गणपती

 

अश्रू झाले मूक अंतरी उरी वेदना दाटली

आर्त हाक ती कशी गणेशा तू नाही रे ऐकली

विश्वासाने विनायका जन दुःख तुला रे सांगती

शोध मूळ तू या विघ्नाचे निवार संकट गणपती

 

कसा करावा मुळारंभ अन्, कैसे ग म भ न लिहावे

दिवस लोटले वर्ष संपले दोस्तास कसे पहावे

अजाणते वय भाबडी मने मनात उत्तर शोधती

शोध मूळ तू या विघ्नाचे  निवार संकट गणपती

 

अंधाराचे मळभ जाऊन, श्वास करावा मोकळा

तुझे आगमन शुभ व्हावे तो किरण दिसावा कोवळा

एकजुटीने जल्लोषाने तुझी करावी आरती

शोध मूळ तू या विघ्नाचे निवार संकट गणपती

 

चौदा विद्या चौसष्ठ कला साऱ्यांचा तू अधिपती

शोध मूळ तू या विघ्नाचे निवार संकट गणपती

 

© सौ. प्रतिभा पद्माकर जगदाळे

सांगली

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈