श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
पुढल्या वर्षी….. ? श्री प्रमोद वामन वर्तक
दहा दिवसांचा सोहळा
आता उद्या संपन्न होणार,
वाजत गाजत आले बाप्पा
वाजत गाजत जाणार !
वेळ होता आरतीची
कानी घुमेल झांजेचा नाद,
गोडधोड प्रसादाचा पुन्हा
पुढल्या वर्षी मिळेल स्वाद !
जातील परत चाकरमानी
घरी आपल्या मुंबईला,
येऊ पुढल्या वर्षी लवकर
सारे बाप्पाच्या तयारीला !
घर मोठे गजबजलेले
आता शांत शांत होईल,
सवय होण्या शांततेची
वेळ बराच बघा जाईल !
होता उद्या श्रींचे विसर्जन,
रया जाईल सुंदर मखराची,
पण घर करून राहील मनी
मूर्ती मखरातल्या गणेशाची !
© श्री प्रमोद वामन वर्तक
१८-०९-२०२१
(सिंगापूर) +6594708959
मो – 9892561086
ई-मेल – [email protected]
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈