मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

अल्प  परिचय 

अनेक कविता अनेक दिवाळी अंक,मासिके, वृत्त पत्रे यातून प्रकाशित.

‘बंद मनाच्या दारावर’ हा कविता संग्रह प्रकाशित. ‘काफला’ या प्रातिनिधिक गझल संग्रहात गझलेचा सामावेश.

? कवितेचा उत्सव ?

☆ अप्रूप ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर ☆ 

देवू नयेच मोका कोणास सांत्वनाचा

राखावया हवा त्या सन्मान आसवांचा

 

साधाच वाहणारा वारा नको म्हणू हा

अंदाज लागतो ना केंव्हाच वादळांचा

 

आहे सुखात सांगू त्यांना; टिपून डोळे

दाटून कंठ आहे प्रत्येक माणसाचा

 

दारात चांदण्यांची तिष्ठून वेळ गेली

डोईवरी उन्हाळा आता सहावयाचा

 

बोलाविल्याविनाही भेटून दुःख जाई

नाही निरोप आला केंव्हा सुखी क्षणांचा

 

बाहेर..आत..आहे वैशाख हा जरीही

तू भेटताच होतो आभास श्रावणाचा

 

ऐकून हाक माझी ना थांबले कुणीही

ती माणसेच होती का खेळ सावल्यांचा?

 

दारी वरात येते थाटात त्या सुखांची

आवाज वेदनेच्या येतो न पावलांचा

 

जोजावले सुखाला मांडीवरी जसे मी

केला तयार खोपा दुःखास काळजाचा

 

तोही लबाड कावेबाजातला निघाला

जो भासवीत होता सात्विक आसल्याचा

 

वाटे मलाच माझे अप्रूप आज याचे

होता निभावला मी रे संग आपल्यांचा

 

प्रत्येक माणसाचा आधार होत गेलो

दुःस्वास सोसला मी होता जरी जगाचा

 

वाटे सरावलेले जीणे तुझ्याविना ही

जातोच तोल आहे अद्यापही मनाचा

 

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈