प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर
परिचय
शिक्षण: D.Ed.M.A.M.Md.Hindi.M.A.M.ED.SET शिक्षणशास्त्र, Diploma in School Management, and Dramatics, Bachelor in Journalism, Certificate in Counsellor, human rights, radio jockey
प्रकाशित पुस्तके:
माझे मातीतले पाय. कविता संग्रह
काळजातला बाप. कविता संग्रह
पुरस्कार:
- उत्कृष्ट साहित्य लेखन राज्यस्तरीय हुतात्मा गौरव पुरस्कार कराड..2008
- साहित्य भूषण पुरस्कार,कोल्हापूर..2021
- डाॅ.आंबेडकर राष्ट्रीय फेलेशिप अॅवाॅर्ड..भारतीय दलित साहित्य अकादमी.नवी दिल्ली..2021
- सभासद: अ.भा.मराठी चित्रपट महामंडळ.
- अध्यक्ष: डाॅल्फिन नेचर गृप सांगली.
सम्प्रत्ति: मुख्याध्यापक, वि. शा. पाटील प्रा. शाळा, बुधगाव जि. सांगली.
कवितेचा उत्सव
☆ तिचं चूलवान……!! ☆ प्रा.अरूण विठ्ठल कांबळे बनपुरीकर ☆
चुलीत जाळ फुकन फुकून
धुरकाटलेल्या काळजानं
ती ;
जाळत रहायची ,
तिचं करपलेलं आयुष्य..
जळणकाटूक हुडकून हुडकून ,
रचत जायची रोज ती ;
तिच्या जल्माचं सराण..!
काळपाटलेल्या घरासारखंच
तिचं काळपाटलेलं जीणं,
घरादाराच्या मुखासाठी
घास बनून जायचं.
…..
कुणीतरी दिला होता तिला
एक जुनाट इस्टू.
घासलेट भरून
पंप करता करता,
तिचं आयुष्य फरफरत रहायचं
कॅनातलं घासलेट संपेपर्यंत.
पिना टोचून-हवा भरून
रीत्या होत जाणाऱ्या इस्टूकडं ;
आणि
लालबूंद झालेल्या बर्नरकडं ;
कौतूकानं पहात,
झिजलेल्या वायसरसारखी
झिजत रहायची ती….!
……..
आता तिला सरकारी योजनेतून
मिळालीय गॅसची शेगडी…
थरथरत्या हातानं बटणं फिरवत,
लायटरची चुटचूटणारी ठिणगी,
तिच्या सरणाऱ्या आयुष्यात
पेटवत राहतेय ज्योत…!
काळपटलेल्या आयुष्याच्या
सुरकुतलेल्या रेषां,
चेहऱ्यावर सांभाळणारी
ती ;
नातवानं आणलेला इंडक्शन
उगीचच न्याहळत राहते….
……………………
आणि
चुलीवरचंच खावं वाटणाऱ्या
नातवांसाठी,
सुरकुतलेल्या हास्यानं ,
पून्हा ….
चुलवानाचे चटके सहन करत
हरखून जाते ती;
टम्म फुगलेल्या
तव्यातल्या भाकरीसारखे…..
…………
तिचं आणि चुलवानाचं नातं
मला मात्र;
असं चटका देऊन जातं…!
………………………………..
© प्रा.अरुण कांबळे बनपुरीकर..
‘काळजातला बाप ‘कार
बनपुरी ता.आटपाडी जि.सांगली
मो ९४२११२५३५७
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈