कवितेचा उत्सव
☆ कुणी सांगावं? ☆ सुश्रीअनुराधा पोतदार ☆
कुणी सांगावं?
दहा जणांच्या नांदत्या परिवारातला तोही एक कुटुंबवत्सल गृहस्थ असेल.
खानदानी बुरखा माथ्यावरून खाली झुकला म्हणून कधी काळी चार शब्द
त्याने तिला सुनावलेही असतील.
न मिळालेल्या बढतीच किल्मिष
त्याच्याही चित्तात खदखदत असेल.
आपल्या रूग्ण पुत्राच्या उशापायथ्याशी बसून
त्यानही मुकी आसवं ढाळली असतील.
पण आज……..
आज मृत्यूच्या हलत्या बुबुळांशी आपले निश्चल नेत्र भिडवून
त्यानं उभ्या जन्माचच नव्हे,अवघ्या माणूसपणाचचं सोनं केलं.
त्याला पोटाशी घेताना सागरालाही आईपण आलं.
आयुष्याच्या बुडत्या जहाजावर धीरानं उभ्या राहिलेल्या
किती जीवांची मानवंदना आज त्या सागरतळाशी घुटमळत असेल
कुणी सांगावं ?
© सुश्रीअनुराधा पोतदार
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈