कवितेचा उत्सव
☆ दोरीवरचे पातळ ☆ वि. म. कुलकर्णी ☆
लटकते दोरीवरी
आज हिरवे पातळ
घडी मोडुनिया ज्याची—
झाला नाही फार वेळ
आज इथे आणि तिथे
येई कंकण – झंकार
उष्ण तरूण रक्ताचा
उच्चारीत अनुस्वार
काळी पोत गो-या कंठी
दावी लाडिक लगट
तास बिल्वरांवरचे
नव्हाळीने मिरवत
उभी बुजून दाराशी
कोरी मख्मली चप्पल
कोरी ट्रंक सामानात
करी उगाच धांदल
आज फिरती घरात
दोन अचपळ डोळे
दोरीवरचे पातळ
मंद झुळुकीने हले !
वि. म. कुलकर्णी
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈