श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
कवितेचा उत्सव
☆ काळाचा हा प्रवाह… ☆ श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर ☆
काळाचा हा प्रवाह वाहे
दिवस-रात्र ही नांवे लेऊन
सुपिकतेचा-नापिकतेचा
गाळ आपुल्या संगे घेऊन
काळाचा हा प्रवाह वाहे
कधी संथ.. कुठे ओढ भयंकर
कधी कोरडा; निळ्या तळ्यासम
तलम धुक्याची ओढुन चादर
प्रवाहातले…तीरावर चे
क्षुद्र जीव हे आपण सारे
फक्त सोसणे अपुल्या हाती
कधी ग्रीष्म..कधी वसंत-वारे
झाले गेले विसरुन सारे
पुन्हा एकदा रंगू खेळी
दुःखाला ही हसण्या देऊ
हासून आनंदाची टाळी
नवीन स्वप्ने, नवीन आशा
नवी पालवी पुन्हा मनाला
विसरून चिंता..भिती उद्याची
जगून घेऊ अता ‘आज’ला
काळाचा हा प्रवाह वाहे
वहात जाणे त्याच्या संगे
भान ठेवूनी पैलतीराचे
पहायचे ना वळून मागे
काळाचा हा प्रवाह वाहे
दिवस-रात्र ही नावे लेऊन
जे वाट्याला, भोगू…चाखू
तळहातीचा प्रसाद समजून…..
© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर
संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा टाकिज जवळ, मिरज
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈