सौ. स्वाती रामचंद्र कोरे
कवितेचा उत्सव
☆ नवे जग खुले आहे ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆
सुखभऱ्या क्षणातल्या
खूप साऱ्या आठवणी
संकटाच्या वेळी उरे
फक्त डोळ्यातले पाणी ।।१।।
निसर्गाच्या आपत्तींना
पर्यायच नसे काही
मनातल्या वादळांना
साथ देण्या कोणी नाही ।।२।।
जीवनाच्या वाटेवर
भेटतात खूप जण
संघर्षाच्या काळी असे
आपलेच गं आपण ।।३।।
हरवल्या वाटेवर
नवी वाट शोधायची
खवळल्या सागरात
नौका तूच हाकायची ।।४।।
राणी लक्ष्मी,सावित्रीचा
वसा संघर्षाचा घेऊ
सांभाळत स्वतःलाच
एकमेंका साथ देऊ ।।५।।
आदिमाया आदिशक्ती
तुझ्या ठायी सदा वसे
घेता जाणून शक्तीला
आव्हानच तुला नसे ।।६।।
भार अवघ्या जगाचा
पेलण्याचे बळ आहे
टाक पाऊल जोमाने
नवे जग खुले आहे ।।७।।
© सौ. स्वाती रामचंद्र कोरे
खानापूर,जिल्हा सांगली
मो.9096818972
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈